मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचं अभिनंदन केलं आहे. “रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते”, असं ट्विट त्यांनी केलं आहे. पहिल्यांदा रावणाला मदत करणारी शूर्पणखा नको, अशी भूमिका घेत चाकणकरांवर आसूड ओढणाऱ्या चित्रा वाघ यांनी चाकणकरांची निवड होताच मैत्रीला जागत त्यांचं अभिनंदन करणारं ट्विट केलं आहे.
रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चित्रा वाघ काय प्रतिक्रिया देणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. कारण ज्यावेळी चाकणकरांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होतं, त्यावेळी रावणाला मदत करणारी शूर्पणखा अध्यक्षपदी नको, अशी भूमिका घेत चाकणकरांच्या निवडीला चित्रा वाघ यांनी विरोध केला होता. मात्र काल रात्री (बुधवारी) चाकणकरांच्या निवडीची अधिकृत घोषणा झाली. राजकारण्यांनी अभिनंदनाचे ट्विट करायला सुरुवात केली. ज्यानंतर चित्रा वाघ यांच्या ट्विटकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. परंतु अपेक्षेप्रमाणे चित्रा वाघ यांनी चाकणकरांचं अभिनंदन करणारं ट्विट केलं आहे. पण हे ट्विट करताना त्यांनी भाजपच्या लढ्याला यश आलं असं म्हणताना राज्य सरकारला सल्लाही दिला आहे.