सोलापूर : सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग असलेल्या शाळा दिनांक ४ ऑक्टोबर पासून सुरू करण्यासाठी आयुक्त,सोलापूर महानगरपालिका श्री पि.शिवशंकर यांनी परवानगी दिली आहे.त्यानुसार शहरातील जवळपास १५५ शाळा शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून अध्यापनाचे काम सुरू करणार आहेत.कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मागील अनेक महिन्यांपासून सोलापूर शहरातील शाळा या बंद होत्या.
सद्यस्थितीत कोविड-१९ चा शहरातील प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आजपासून सर्व शाळा सुरू होत आहेत.शाळांनी पूर्वतयारी कशाप्रकारे केली आहे,याबाबत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन पाहणी केली आहे.त्याचबरोबर उद्यापासून शाळा भेटी करून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात आहे किंवा कसे याबाबतची पाहणी ही विविध पथकांच्या द्वारे केली जाणार आहे. त्याचबरोबर मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना शासन आदेशाप्रमाणे कोणत्या मार्गदर्शक सूचनांची कार्यवाही करणे अपेक्षित आहे याबद्दल ही मार्गदर्शन आणि मदत केली जाणार आहे. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील सन्माननीय लोकप्रतिनिधी तसेच इतर विभागाचे अधिकारी यांनीही शाळांना भेटी देऊन शाळांनी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.