सोलापूर शिक्षण संवाद उपक्रमात सीईओ दिलीप स्वामी यांचे आवाहन
सोलापूर : शिक्षकांनी कोविड काळात स्वच्छ सुंदर शाळा, मुला-मुलींची आरोग्य तपासणी व लसीकरण मोहिमेसाठी दिलेले योगदान मोलाचे आहे. येत्या ४ आॅक्टोबर रोजी शाळा सुरू होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या, असे भावनिक आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्हा परिषदेतील निधी कक्षात शाळा सुरू होणार असल्याने शिक्षण संवाद उपक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी सीईओ स्वामी यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डाॅ. कोरडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भास्कर बाबर, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ. किरण लोहार, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, विस्तार अधिकारी हरिष राऊत, मुख्याध्यापक संघाचे तानाजी माने प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
स्वामी म्हणाले, कोरोनात ज्या मुलांकडे मोबाइल नव्हता त्यांच्यासाठी पारावरच्या शाळा घेतल्या. पालकांची भेट घेऊन संभाव्य लाटेचा विचार करून मुलांची आरोग्य तपासणी केली. स्वच्छ सुंदर शाळा उपक्रमांत ३ कोटी ७७ लाखांहून लोकवर्गणी गोळा करून स्वच्छ सुंदर शाळा केल्या. चांगले योगदान दिले. एक पद एक वृक्ष लागवड केली. शाळा बंद असताना ही कामे केली. आता शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची आरोग्याची काळजी घ्यावी.