जळगाव : चाळीसगाव तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. ढगफुटी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तितूर आणि डोंगरी नद्यांना मोठा पूर आला असून यामुळे चाळीसगाव शहराच्या काही भागांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. तर कन्नड घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळल्या आहेत. मात्र, घाटात अनेक वाहने अडकली आहेत. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने वाहन अडकली आहेत. दरम्यान, पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.
दरम्यान, दरड कोसळल्याने धुळे- औरंगाबाद- सोलापूर महामार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी इतर मार्गाने प्रवास करावा, असे अवाहन पोलिसांनी केले आहे. औरंगाबादला जाण्यासाठी चाळीसगाव मार्गे प्रवास करावा. तर, पुण्याहून औरंगाबादला यायचे असेल तर जळगावकडून यावे लागेल. कन्नड घाटात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू असून दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मध्यरात्री पासून उगमस्थळांवर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तितूर आणि डोंगरी नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. यामुळे चाळीसगाव शहराच्या मध्यावरून गेलेल्या तितूर नदीचे पाणी परिसरात शिरले. रात्री उशीरापासून पुराचे पाणी आल्याने परिसरातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. आज सकाळी सुध्दा पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरले. तसेच बाजारपेठेतही पाणी शिरल्याची माहिती आहे.दरम्यान, तितूर आणि डोंगरी नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तर गिरणा काठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.