पंढरपूर : मौजे पिराची कुरोली ता. पंढरपूर येथील इसम नामे मधुकर जनार्दन सावंत हा त्याच्या पत्नीस घराजवळील अंबाबाईचे मंदीराकडे थोडा वेळ बसून येतो म्हणून गेला होता. परंतु तो घरी परत न आल्याने त्याचे नातेवाईक हे त्याचे शोध घेत होते, दरम्यान दिनांक 16 ऑगस्ट रोजी 11ः30 वा. च्या दरम्यान मौजे पिराची कुरोली ता. पंढरपूर येथील शांताबाई सावंत यांचे शेतातील विहिरीतील पाण्यात एक पुरुष जातीचे प्रेत पाण्यात तरंगत असल्याबाबत माहिती मिळाली.सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.शाखेने या खुनाचा शोध लावला आहे.
मयताचा पुतण्या सागर माणिक सावंत यांने कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून फिर्यादीचा चुलता मधुकर जनार्दन सावंत याचे डोकीस मारून, त्याचे अंगावरील कपडे काढून त्यास काळया रंगाच्या दोरीने दगड बांधून शांताबाई सावंत याचे विहीरीच्या पाण्यात जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून फिर्याद दिल्याने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठान्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून गुन्हयाचे ठिकाणी वरिष्ट पोलीस अधिकारी यांनी भेटी दिल्या होत्या. पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अतुल झेंडे यांचे मार्गदर्षनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक व पोलीस ठाणेकडील एक पथक असे दोन वेगवेगळे पथके तयार करून सदरचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील व सपोनि रविंद्र मांजरे यांचे पथक गुन्हयाचे ठिकाणी भेट दिल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांनी सपोनि रविंद्र मांजरे व त्यांचे पथकास सदरचा गुन्हा हा शेतीच्या कारणावरून, अनैतिक संबधावरून, व वादावादीतून घडला असल्याबाबत शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषगाने तपास करून गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सपोनि रविंद्र मांजरे व त्यांचे पथक गांवात तळ ठोकून गुन्हा कोणत्या कारणावरून घडला आहे ? याबाबत माहिती घेत असताना, त्यांना गोपनीय माहिती माहिती मिळाली की, यातील मयत मधुकर जनार्दन सावंत यास दारू पिण्याचे व्यसन होते. दारूच्या नशेत तो नेहमी बायकोस व घरातील लोकांना शिवीगाळ करीत असल्याची माहिती मिळाली. त्याबाबत अधिक माहिती घेतली असता मयत हा दारू पिऊन गांवातील एका इसमाचे मयताच्या बायकोबरोबर असलेल्या अनैतिक संबंधाचे संशयावरून संबंधीत इसमास नेहमी शिवीगाळ करीत असलेबाबत माहिती मिळाली. त्यावरून संबंधीत इसमास ताब्यात घेवून त्याचेकडे विचारपूस करता तो सुरूवातीस उडवाउडवीची उत्तरे देवू लागला, त्यास अधिक विष्वासात घेवून कौषल्यपूर्ण चौकशी केली असता त्याने सांगितले की, यातील मयत व्यक्ती हा त्याच्या बायकोबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेवून दारूच्या नशेत नेहमी त्यास शिवीगाळ करीत होता.
दिनांक 11 ऑगस्ट रोजी सांयकाळी मयतास गांवातील मंदीराजवळ भेटल्यानंतर गोड बोलून दारू पाजून शांताबाई सावंत याचे विहिरीजवळ नेवून दगडाने त्याच्या डोकीत पाठीमागील भागावर मारले असता तो बेशुध्द पडल्यानंतर त्याचे अंगावरील कपडे काढून सोबत आणलेल्या दोरीने त्यास दगड बांधून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने विहिरीतील पाण्यात ढकलून दिले असल्याचे सांगितले.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्षनाखाली, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी बजावली आहे.