पंढरपूर : पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील माढा , करमाळा , माळशिरस, व सांगोला या पाच तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने 13 ऑगस्टपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला पंढरपूर व्यापारी महासंघाने तीव्र विरोध केला आहे. यासंदर्भात भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर व्यापारी महासंघाची बैठक झाली. या बैठकीमध्ये तीन दिवस जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या (मंगळवारी) सकाळी छत्रपती शिवाजी चौकामध्ये घंटानाद आंदोलन केले जाणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात असलेल्या लॉकडाउनमुळे पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील व्यापारी, व्यावसायिक व दुकानदार मेटाकुटीला आले आहेत. आषाढी वारीसह अनेक धार्मिक सोहळे रद्द करण्यात आल्याने अनेकांचा व्यवसाय बंद पडला आहे. त्यातच आता संचारबंदीचा आदेश काढण्यात आल्याने हातावरील पोट असलेल्या व्यावसायिक व नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे 11 ऑगस्ट रोजी व्यापारी महासंघाच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला जाणार आहे. 12 ऑगस्ट रोजी येथील प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 13 ऑगस्ट रोजी पंढरपूर शहरातील सर्व व्यापारी आपली दुकाने उघडी ठेवणार आहेत. मागील काही दिवसांपासून कोरोना नियमांचे कडक निर्बंध लागू केले जात आहेत. त्यातच सातत्याने दुकाने बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आता 13 ऑगस्टपासून पंढरपूरसह पाच तालुक्यांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केल्याने व्यापारी व नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे आता व्यापारी विरुद्ध प्रशासन असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.बैठकीला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, सोमनाथ डोंबे, अप्पा मुचलुंबे, रा. पा. कटेकर, सचिन कारंडे, दत्ता लटके, कौस्तुभ गुंडेवार, रामकृष्ण वीर महाराज, अंबादास डांगे आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.