टोकियो: भारताची बॉक्सर लव्हलिन बोर्गोहेनने महिलांच्या ६९ किलो गटात कास्य पदक पटकावले. टोकियो ऑलिम्पिकमधील हे भारताचे तिसरे पदक ठरले आहे. उपांत्य फेरीत तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीने लव्हलिनचा पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.भारताच्या लव्हलिनने उपांत्य फेरीत प्रवेश करून लढती आधी देशासाठी पदक निश्चित केले होते.
पदकाचा रंग कोणता असेल याची सर्वांना उत्सुकता होती. आज ४ ऑगस्ट रोजी झालेल्या लढतीत सुरमेनेलीने तिचा ५-० असा पराभव केला.ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे बॉक्सिंग मधील तिसरे पदक आहे. याआधी २००८ मध्ये विजेंदर सिंगने तर मेरी कोमने २०१२ मध्ये कास्य पदक जिंकले होते. त्यानंतर ९ वर्षांनी भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले आहे. पदकतालिकेत सध्या चीन ३२ सुवर्ण, २१ रौप्य आणि १६ कास्य पदकासह पहिल्या तर अमेरिका २५ सुवर्ण, २९ रौप्य आणि २१ कास्य पदकासह दुसऱ्या स्थानावर आहे. जपान २० सुवर्ण, ७ रौप्य आणि १२ कास्य पदकासह तिसऱ्या स्थानावर आहे. भारत एका रौप्य आणि दोन कास्य पदकासह ६२व्या स्थानावर आहे.