जोरहाट : काँग्रेस नेते राहुल गांधी आसामच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत. जोरहाट येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी आसामच्या जनतेवर आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. राज्यातील जनतेला मोफत वीज देणार, महिलांना दर महिन्याला दोन हजार रुपये भत्ता देणार आणि राज्यात पाच लाख रोजगारांची निर्मिती करणार, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं आहे.
जोरहाट येथील रॅलीत विकास कामे आणि काँग्रेसच्या अजेंड्यावर भाष्य करतानाच राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्रातील मोदी सरकार केवळ हम दो और हमारे दो… या उक्तीनुसारच काम करत आहे. यात गरीब जनता, शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांचा काहीही विचार करण्यात आलेला नाही, असं राहुल गांधी म्हणाले. तुमच्या खिशातला पैसा काढून तो उद्योगपतींना दिला जात आहे. मोदी सरकार हेच काम करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.