येस न्युज मराठी नेटवर्क : गली बॉय’ अक्षर पटेल आणि अनुभवी आर. अश्विन यांच्या फिरकी गोलंदाजीला रोहित शर्माच्या फलंदाजीचं मिळालेल्या बळाच्या जोरावर तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडचा दहा विकेटनं पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघानं चार कसोटी सामन्याच्या मालिकेत २-१ नं आघाडी घेतली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात अक्षर पटेलनं ११, अश्विन यानं ७ आणि वॉशिंगटन सुंदर यानं एक बळी घेतला. भारतीय फिरकीपटूनं तिसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या १९ गड्यांना बाद केलं. रोहित शर्मानं पहिल्या डावांत महत्वाची ६६ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावांतही महत्वाच्या २५ धावा जोडल्या.
इंग्लंडच्या संघानं विजयासाठी दिलेलं अवघ्या ४९ धावांचं आव्हान भारतानं एकही गडी न गमावता पार केलं. दुसऱ्या डावांत रोहित शर्मानं २५ धावांची खेळी केली. तर गिल यानं १५ धावांची खेळी केली. दुसऱ्या डावांत इंग्लंडच्या एकाही गोलंदाजाला आपला प्रभाव पाडण्यात यश आलं नाही. रोहित शर्मा आणि गिल यांनी बिनबाद ४९ धावांची भागिदारी केली.
इंग्लंडचा दुसरा डाव ८१ धावांत गुंडाळला
लोकल बॉय अक्षर पटेल आणि अनुभवी आर. अश्विन यांच्या फिरकीपुढे इंग्लंड संघानं लोटांगण घेतलं. भारतीय संघाप्रमाणेच इंग्लंडचा दुसरा डावही गडगडला. अक्षर पटेल आणि अश्विन या फिरकीपुढे इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावांत फक्त ८१ धावांपर्यंत मजल मारु शकला. अक्षर पटेल यानं पुन्हा एकदा पाच गडी बाद करण्याची किमया केली आहे. तर अश्विन यानं दुसऱ्या डावांत चार गड्यांना तंबूत धाडलं. वॉशिंगटन सुंदर यानं एक बळी मिळवला. अक्षर पटेल यानं पहिल्या डावांत सहा गडी बाद केले होते. तिसऱ्या कसोटी सामन्यात अक्षर पटेल यानं ११ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. तर अश्विन यानं सात गडी बाद केले आहेत.
दुसऱ्या डावांत इंग्लंडच्या एकाही फलंदालाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. इंग्लंडकडून बेन स्टोक्सनं सर्वाधिक २५ धावा केल्या. तर कर्णधार जो रुट अवघ्या १९ धावांवर अक्षर पटेलचा शिकार ठरला. इंग्लंडच्या चार फलंदाजांना खातेही उघडता आलं नाही. तर फक्त तीन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या ओलांडता आली.