प्रिसिजनला मिळालेल्या सुवर्णपदकामुळे देशपातळीवरील उद्योगक्षेत्राने घेतली सोलापूरची दखल
सोलापूर : ऑटोमोटिव्ह कंपोनन्ट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘अॅक्मा’च्या वतीने प्रिसिजन उद्योगसमूहाला ‘अॅक्मा एक्सलन्स अॅवार्ड २०२०’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ‘सर्वोत्कृष्ट निर्यातदार’ तसेच ‘सर्वोत्कृष्ट आरोग्य, सुरक्षा व पर्यावरण’ असे दोन सुवर्ण पुरस्कार प्रिसिजनला देण्यात आले आहेत. लार्ज कॅपिटल इंडस्ट्री या श्रेणीतून प्रिसिजनची निवड करण्यात आली आहे.
‘अॅक्मा’ ही ऑटोमोबाईल क्षेत्राला ऑटो कंपोनन्ट्सचा पुरवठा करणार्या उत्पादकांची नावाजलेली संघटना आहे. ‘अॅक्मा’तर्फे विवेक हरिदास यांच्या हस्ते प्रिसिजन कॅमशाफ्ट्सच्या चिंचोळी एमआयडीसीतील उत्पादन प्रकल्पात पुरस्कार वितरण झाले. कंपनीचे चेअरमन यतिन शहा, कार्यकारी संचालक करण शहा, सरव्यवस्थापक अजित जैन, अच्युत गद्रे, उपसरव्यवस्थापक दिपक कुलकर्णी, सेफ्टी ऑफिसर सुहास पाटील, अॅडमिनिस्ट्रेशन व्यवस्थापक सिद्धेश्वर चंदनशिवे यांनी हे पुरस्कार स्वीकारले. यावेळी कंपनीच्या एचआर विभागाचे सरव्यवस्थापक राजकुमार काशिद यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
‘अॅक्मा’ची सहावी टेक्नॉलॉजी समिट दि. २५ फेब्रुवारी रोजी पार पडली. त्यामध्येही व्हर्चुअली प्रिसिजनला देण्यात आलेल्या पुरस्काराची घोषणा झाली. तसेच पुरस्कार विजेत्या उत्पादकांची माहिती असणार्या ‘इम्पॅक्ट’ या विशेषांकातही प्रिसिजन उद्योगसमूहाचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे प्रिसिजन उद्योगसमूहाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. प्रिसिजनमुळे सोलापूरचे नांव देशपातळीवरील औद्योगिक वर्तुळात पुन्हा एकदा नावारूपास आले आहे.