सोलापूर, दि.3: कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत नव्याने व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी इच्छुक संस्था/आस्थापनाकडून 25 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी एस.डी. शिंदे यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळाचे व्यवसाय अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यासाठी नियमित शुल्कासह 25 फेब्रुवारी तर विलंब शुल्कासह 5 मार्च 2021 पर्यंत अर्ज करता येणार आहे. मान्यता मिळविण्याची कार्यपद्धती, नियमावली, अटी व शर्ती, विविध अभ्यासक्रम, शुल्काबाबत माहिती मंडळाच्या माहिती पुस्तिकेत उपलब्ध करण्यात आलेली आहे. अर्ज आणि माहिती पुस्तिका मंडळाच्या www.msbsde.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रिंट काढून परिपूर्ण माहिती भरलेला अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे, चलन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयात मुदतीत सादर करावा, मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, महानगरपालिकेसमोर, नॉर्थकोट प्रशाला आवार, डफरीन चौक, सोलापूर या कार्यालयास संपर्क साधावा किंवा 0217-2950955 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे.