पात्र व इच्छुक प्रशिक्षणार्थी यांनी 13 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत
सोलापूर, दिनांक 12:- मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील मंजूर पदांच्या 5 टक्के प्रमाणे एकूण 699 प्रशिक्षणार्थी यांची निवड करावयाची आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता 12 वी, पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी अशी आहे. तसेच ग्रामपंचायत स्तरावर निवडीसाठी योजनादुत प्रशिक्षणार्थी म्हणून 1022 प्रशिक्षणार्थी भरावयाचे आहेत. त्यासाठी शैक्षणिक अर्हता इयत्ता 12 वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल, प्रशिक्षणार्थीला शैक्षणिक अर्हतेप्रमाणे 12 वी पास रूपये 6 हजार, आयटीआय, पदविका रुपये 8 हजार, पदवीधर/पदवीत्तर रुपये 10 हजार प्रतिमाह विद्यावेतन दिले जाईल.
पात्र युवक उमेदवारांना कौशल्य विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in/admin या वेबसाईटवर अर्ज दाखल करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.
युवक उमेदवारांना अर्ज करण्याचा कालावधी दि.10 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत असेल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी कळविले आहे.
अर्ज करण्यासाठी अट- उमेद्वार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा, उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष व कमाल वय 35 वर्ष असावे, उमेदवाराची आधार नोंदणी, तसेच उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे, इच्छुक उमेदवारांनी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in/admin या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे व पोर्टलवरील पदांसाठी online Apply करणे आवश्यक आहे, अधिक माहितीसाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय दि.9 जुलै 2024 चे वाचन करावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आव्हाळे यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रचलित शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे जिल्हा परिषद सोलापूरच्या आस्थापनेमधील मजूर पदाच्या 5 टक्के इतके उमेदवार 6 महिने या कालावधीकरिता कार्यप्रशिक्षणासाठी घेण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर लिंक प्रसिध्द करण्यात आली आहे.