मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यापासून फक्त 2 जणांवर कारभार चाललेल्या राज्यातील शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. त्यामुळे तब्बल 40 दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्याला किमान 20 जणांचे मंत्रिमंडळ मिळाले आहे.
आज राजभवनात शपथविधी पार पडला. यामध्ये भाजपकडून पहिली शपथ काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा या क्रमाने 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
राधाकृष्ण विखे पाटील यांचा काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस ते भाजप असा प्रवास
विखे पाटील घराण्याला मोठा सहकार आणि राजकीय वारसा आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज त्यांना पहिल्यांदा शपथ देण्यात आली. त्यांचा काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस ते भाजप असा त्यांचा प्रवास राहिला आहे. जवळपास सहा मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांनी काम केलं आहे. त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून सक्षम जबाबदारी पार पाडण्याऐवजी 2014 मध्ये भाजपत प्रवेश केला होता.
दीपक केसरकरही काँग्रेस-राष्ट्रवादी- शिवसेना आणि आता फुटीर शिंदे गटात
शिंदे गटात गेल्यानंतर कळी खुललेल्या दीपक केसरकर यांची सुद्धा फिरती निष्ठा राहिली आहे. दीपक केसरकर यांचाही काँग्रेस-राष्ट्रवादी- शिवसेना आणि आता फुटीर शिंदे गटात असा प्रवास झाला आहे. आता ते शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. आज त्यांना फिरत्या निष्ठेने कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. पहिल्यांदा काँग्रेसमध्ये प्रवेश मग त्या ठिकाणी जम न बसल्याने 2009 मध्ये राष्ट्रवादीत आणि मग 2014 मध्ये शिवबंधन आणि आता शिंदे गटातून मंत्री असाच प्रवास केसरकरांचा राहिला आहे.
उदय सामंत राष्ट्रवादीतून शिवसेनेत, आता शिंदे गटात
उदय सामंत वेळ पाहून राजकारणातील फिरता चषक राहिले आहेत. 2004 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी 10 वर्ष राजकीय नशीब आजमावल्यानंतर 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्येही त्यांना मंत्रिपद मिळाले. असे असतानाही शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे दाखवत असतानाच शिंदे कळपात जाऊन सामील झाले. आज झालेल्या शपथविधीमध्येही त्यांचाही शपथविधी झाला आहे.
अब्दुल सत्तार काँग्रेसमधून शिवसेनेत आता शिंदे गटात
अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी ते कोणत्या हिंदुत्वाच्या शोध घेण्यासाठी शिंदे गटात गेले आहेत याचीच चर्चा रंगली होती. मात्र, वेळ पाहून कलटी कशी मारायची हे त्यांच्या राजकीय प्रवासातून लक्षात येते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसच्या मंत्रिमंडळात त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद भूषवले होते. आता शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुलींची टीईटी घोटाळ्यात नावे येऊनही सत्तार मंत्रिपद मिळवण्यात यशस्वी ठरले. मात्र, त्यांच्याच औरंगाबाद जिल्ह्यातील संजय शिरसाट वेटिंग लिस्टवर गेले आहेत.
तानाजी सावंत राष्ट्रवादीतून शिवसेनेत आणि आता शिंदे गटात
तानाजी सावंत यांचाही शिंदे कळपात सामील होण्यापूर्वी राष्ट्रवादीशी घरोबा झाला आहे. त्यांनी 2015 मध्ये राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना शिवसेनेत प्रवेश करताच फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले होते, पण महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना हात चोळत बसावे लागले होते. महाविकास आघाडीत शिवसेनेची कशी कुचंबना होत आहे हे तानाजी सावंत जाहीरपणे सांगत होते. मात्र, मंत्रिपद न मिळाल्याचेही त्यामागे एक कारण होते.
विजयकुमार गावित राष्ट्रवादीतून भाजपमध्ये
विजयकुमार गावित 1995 मध्ये नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा अपक्ष म्हणून विजयी झाले. पहिल्यांदा युती सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर डॉ. गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2000 ते 2014 सलग नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून विजयी होऊन कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.