सोलापूर : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात 11 हजार कोटी रुपये जमा आहेत.त्या जमा रकमेतून यंदाच्या दिवाळीला भेट 10 हजार रुपये देण्यात यावे.तसेच बांधकाम कामगार नोंदणीसाठी लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करावे तसेच सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढावे अन्यथा 29 ऑक्टोबर रोजी राज्यभरातील 50 हजार बांधकाम कामगारांना घेऊन राज्य कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर मोर्चा काढण्याचा इशारा सिटूचे राज्य महासचिव ऍड.एम.एच.शेख यांनी दिला.
सोमवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) च्या वतीने मागणी दिवस पाळण्याची हाक देण्यात आली असून त्या अनुषंगाने सोलापूरात आज बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सहा.कामगार आयुक्त कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सिटू चे राज्य महासचिव अँड.एम.एच.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.अब्राहम कुमार,शंकर म्हेत्रे,सिद्राम म्हेत्रे,अमित मंचले,श्रीकांत कांबळे, युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम, चिदानंद चानापागुल,तानाजी जाधव, भास्कर कुनशीकर यांच्या शिष्टमंडळाने नोंदणी अधिकारी तथा दुकाने निरीक्षक ए.जी.पठाण यांना निवेदन दिले.
बांधकाम कामगारांची ऑनलाइन नोंदणी व पुनर्रनोंदणी तात्काळ व्हावी अथवा ऑनलाइन अर्ज स्वीकारावे. कामगारांच्या विविध प्रलंबित प्रकरणे व थकीत लाभ त्वरीत पूर्तता करावे.अवजारे खरेदी लाभाचे प्रलंबित प्रकरणे त्वरित मंजूर करावे.कोविड 19 चे थकीत अनुदान त्वरित देऊ करावे.5 वर्षाची नूतनीकरण वर्गणी भरलेल्या नोंदणीकृत कामगारांना सर्व अनुदान अदा करावे. तसेच थकीत प्रसूती लाभ, पाल्यांची शिष्यवृत्ती तातडीने अदा करावी. या मागण्या घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले.