येस न्यूज नेटवर्क : सध्या हिंसाचारानं बांगलादेश धुमसत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशात आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळालं. त्यानंतर बांगलादेशात मोठा हिंसाचार उफाळून आला. त्यानंतर तब्बल 15 वर्षांपासून बांगलादेशची धुरा सांभाळणाऱ्या शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि देश सोडून पलायन केलं. हिंसक आंदोलकांनी थेट शेख हसीना यांचं शासकीय निवास्थान लुटलं. सध्या बांगलादेशातील घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे हिंसाचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या हाती गेली. मात्र, आंदोलकांनी देशाची सूत्र लष्कराकडे देण्यास विरोध दर्शवला आहे. हिंसक जमावानं कारागृह देखील सोडलं नाही. तुरुंगात घुसूनही जमावानं जाळपोळ केली. या काळात सुमारे 500 कैदी पळून गेले. या कैद्यांमध्ये अनेक दहशतवाद्यांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत भारतीय लष्करही अलर्ट मोडवर आहे. आज भारत सरकारच्या वतीनं संसदेत बांगलादेश हिंसाचारावर निवेदन देण्यात आलं.