सोलापूर शहरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असून सायबर पोलिसांनी यावर मोठी कारवाई केली आहे. एका प्रकरणात अज्ञात मोबाईल क्रमांकावरून स्वतःला टेलिकॉम अधिकारी व पोलीस अधिकारी असल्याचे सांगत तक्रारदाराला धमकावण्यात आले.
“तुमच्या मोबाईल क्रमांकावर गुन्हा दाखल झाला आहे” अशी भीती दाखवून आरोपींनी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे बनावट कागदपत्रे पाठवली. त्यानंतर तक्रारदाराकडून वेगवेगळ्या खात्यांमध्ये तब्बल ₹21,25,161/- इतकी रक्कम जमा करून घेत फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी सोलापूर शहर सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून दिल्ली येथून एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून मोबाईल व रोख रक्कम जप्त करण्यात आली असून उर्वरित साथीदारांचा शोध सुरू आहे.
नागरिकांना आवाहन:
सायबर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी कॉल, व्हिडिओ कॉल किंवा सोशल मीडियावरून येणाऱ्या धमक्या व आर्थिक मागण्यांना बळी पडू नये. कोणतीही शंका असल्यास त्वरित सायबर हेल्पलाईन 1930 वर संपर्क साधावा.

