स्मार्ट सिटीची प्रलंबित कामे आणि उखडलेल्या रस्त्यांचा बळी…
सोलापूर : दत्त चौक ते लक्ष्मी मार्केट या मार्गावर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरच्या मागच्या चाकाखाली डोके दबल्याने पंधरा वर्षाच्या सायकलस्वार मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फौजदार चावडी पोलिसांनी ट्रॅक्टर चालक चिदानंद अशोक मलगोंडा आणि ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे. सायकल वरून जाणारा मुलगा समर्थ धोंडीबा भास्कर याचा तोल गेल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली त्याचे डोके दबले गेल्याचे अपघात प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितले. गेल्या वर्षभरापासून या भागात स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांची कामे चालू आहेत. सायकल वरून जाणाऱ्या मुलाचा तोल गेल्यामुळे हा अपघात झाला.
सायकल वरून जाणारा मुलगा आणि ट्रॅक्टर एकाच दिशेने जात असताना दमाणी अपार्टमेंट समोर हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. अपघातात मृत्युमुखी पडलेला समर्थ हा पंजाब तालमीजवळ उत्तर कसबा येथे राहणारा आहे. ट्रॅक्टर चालक चिदानंद मलगोंडा सध्या देगाव येथे राहत असून तो मूळचा मंगळवेढा तालुक्यातील डोनज गावचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. मलगोंडा याचा ट्रॅक्टर एम . एच13/CS 6541 पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. एसीपी सुहास भोसले यांनी अपघाताबाबत फौजदार चावडी पोलिस तपास करीत असल्याचे स्पष्ट केले.