नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पर्यटकांच्या बसला नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यात अपघात झाला आहे. नेपाळमधील काठमांडुमध्ये निघालेल्या बसमध्ये एकूण 40 ते 41 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 14 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 16 ते 17 प्रवासी गंभीर जखमी असल्याचं समोर आलं आहे.
नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरात महाराष्ट्रातील एक प्रवासी बस मर्स्यांगडी नदीत कोसळून अपघात झाला. नेपाळ पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. जिल्हा पोलीस कार्यालय तनहुचे डीएसपी दीपकुमार राय यांनी माहिती दिली की, यूपी एफटी 7623 क्रमांकाची बस नदीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. या बसमध्ये तब्बल 40 ते 41 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे.
अपघातात 14 जणांचा मृत्यू
अपघातानंतर मदत आणि बचाव कार्यात 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 16 जखमी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. तसेच, त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोखरा येथील माझेरी रिसॉर्टमध्ये थांबलेल्या महाराष्ट्रातील भाविकांनी घेऊन ही बस काठमांडुकडे रवाना झाली होती. अपघाताच्या वेळी बसमध्ये असलेले सर्व प्रवासी महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळत आहे.