येस न्युज मराठी नेटवर्क : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग सोसायटी घोटाळ्याची तक्रार ईडीकडे केली आहे. सरनाईक यांच्या नावावर 112 साताबारे असल्याची माहितीच सोमय्या यांनी ईडीला दिल्याने सरनाईक यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांची गेल्या चार तासांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. तर पूर्वेश सरनाईक आज नोटीस देऊनही ईडीसमोर हजर झालेले नाहीत. पूर्वेश यांना आतापर्यंत दोन समन्स बजावण्यात आलेले आहेत. तर विहंग यांची दुसऱ्यांदा ईडीची चौकशी सुरू असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या आज अचानक ईडी कार्यालयात पोहोचले. सोमय्या यांनी ईडी कार्यालयात जाऊन विहंग हौसिंग सोसायटीच्या घोटाळ्याची ईडीला माहिती दिली. सरनाईक यांनी या सोसायटीतील काही संपत्ती हडप केल्याचा आरोप करतानाच सरनाईक यांच्याकडे 112 सातबारे असल्याची तक्रारही सोमय्या यांनी ईडीकडे केली आहे.
सरनाईक यांनी 250 कोटी रुपये ढापले आहेत. त्यांनी कंपनीचे नावही बदलले आहे. सरनाईक यांनी ज्यांच्या संपत्ती जप्त केल्या त्यांची नावे सातबाऱ्यावर नसल्याचा दावा करतानाच सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.