बोलेरोमधून वाहतूक होणारी 1040 लिटर हातभट्टी दारु जप्त

0
20

हातभट्ट्यांवरही धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

  • सोलापूर- राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी (ता. 15 मार्च) कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथे एका बोलेरोमधून वाहतूक होणारी एक हजार चाळीस लिटर हातभट्टी दारु जप्त केली आहे, तसेच 14 मार्च रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हातभट्टी ठिकाणांवर संयुक्तपणे छापे टाकून बारा हजार सहाशे पन्नास लिटर गुळमिश्रित रसायन जप्त करुन जागीच नाश केले आहे.
  • याबाबत सविस्तर वृत्त असे की, निरीक्षक ‘ब’ विभाग सदानंद मस्करे यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीनुसार त्यांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर-पुणे हायवेवरील कोंडी येथे सापळा रचून पाळत ठेवली असता त्यांना बोलेरो जीप क्र. MH-21-V-2437 या वाहनातून 13 रबरी ट्युबमध्ये अंदाजे 80 लिटरप्रमाणे 1040 लिटर हातभट्टी दारु वाहतूक होतांना आढळून आली. वाहनचालक हा वाहन जागीच सोडून अंधाराचा फायदा घेवुन पळून गेला. या कारवाईत हातभट्टी दारुची वाहतूक करणाऱ्या अज्ञात फरार इसमाविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनाच्या किंमतीसह एकूण रु. सात लाख त्रेपन्न हजार तिनशे किंमतीचा मुद्देमाल विभागाने हस्तगत केला आहे. ही कारवाई अधीक्षक नितिन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उप-अधीक्षक तथा निरिक्षक ब विभाग सदानंद मस्करे, दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ, अंकुश आवताडे, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, प्रशांत इंगोले यांनी पार पाडली. एका अन्य कारवाईत निरिक्षक संभाजी फडतरे यांच्या पथकाने सोलापूर-अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगर परिसरात सुरेश कोटू चव्हाण, वय 23 वर्षे, रा. मुळेगाव तांडा या इसमाला होंडा पॅशन प्रो मोटरसायकल क्र. MH-13 AS 9535 वरुन तीन रबरी ट्यूबमधून 240 लिटर हातभट्टी दारुची वाहतूक करतांना अटक केली असून या कारवाईत रु. बहात्तर हजार तिनशे किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
  • तसेच 14 मार्च रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अ विभाग, ब विभाग, भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या संयुक्त पथकाने दक्षिण सोलापुर तालुक्यातील गणपत तांडा, सेवा तांडा व गुरप्पा तांड्यांवर धाडी टाकून 5 गुन्हे नोंदवून हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे बारा हजार सहाशे पन्नास लिटर गुळमिश्रित रसायन जप्त करुन जागीच नाश केले. या कारवाईत विश्वनाथ फुलचंद पवार, वय 39 वर्षे, रा. वरळेगाव, सुरेश हरीबा पवार, वय 38 वर्षे, रा. बक्षीहिप्परगा व आशा सुनील चव्हाण, वय ३३ वर्ष रा. गणपत तांडा या 3 आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण दोन लाख एकोणनव्वद हजार नऊशे किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
  • आवाहन
    सोलापूर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री ठिकाणे, हातभट्ट्या, धाबे, हॉटेल तसेच गोवा राज्यातून तस्करी होणा-या दारूवर विभागाने लक्ष केंद्रित केले असून त्याविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आलेली आहेत. तसेच रात्रंदिवस सदर पथकाद्वारे पाळत ठेवण्यात येत असून अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतूकीविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी त्यांच्या परिसरात अवैध दारूची माहिती मिळाल्यास या विभागास संपर्क साधावा.