पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी करणार योजनेचा शुभारंभ
सोलापूर, दि. 18- प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास 100 कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. बहुविध शिक्षण, संशोधन आणि पायाभूत विकासासाठी हा निधी वापरला जाणार आहे.
शनिवारी रात्री केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून निधी मंजूर झालेल्या विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील चार विद्यापीठांचा समावेश आहे. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचाही समावेश आहे आणि 100 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. मंगळवार, दि. 20 फेब्रुवारी 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण निधी मंजूर झालेल्या सर्व विद्यापीठांमध्ये दाखवण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उच्च शिक्षणाविषयी तसेच विद्यापीठांविषयी संबोधित करणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात दि. 20 फेब्रुवारी 2024 रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठातील संचालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून निधी मिळण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून ऑनलाईन माध्यमातून प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्याचे सादरीकरण ही करण्यात आले होते. त्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला आहे. यानिमित्त केंद्र व राज्य सरकार तसेच राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. विकासचंद्र रस्तोगी, योजनेचे राज्य समन्वयक डॉ. विनायक निपुण आदींचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी आभार मानले आहेत. या पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. मलिक रोकडे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत आदी उपस्थित होते.