सोलापूर – अन्न, पाणी व निवारा या तीन मूलभूत गरजा नंतर मानवाची वीज ही चौथी गरज निर्माण झालेली आहे. तरी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी व उद्योजक या सर्व ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार अखंडित वीज पुरवठा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.
नियोजन भवन येथे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी व एनटीपीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "उज्वल भारत उज्वल भविष्य"- सन 2047 या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी शंभरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी एनटीपीसी चे मुख्य महाव्यवस्थापक श्रीनिवासन राव, दीपकरंजन जवेरी, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता संतोषकुमार सांगळे, सोलापूर शहर कार्यकारी अभियंता अशिष मेहता व वीज वितरण कंपनीचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शंभरकर पढे म्हणाले की, वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या मागणीप्रमाणे प्रत्येक वीज ग्राहकांना वीज उपलब्ध करावी. वीज वितरण सुरळीतपणे होण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. यासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
कोविडनंतरच्या काळात संपूर्ण देशभरात विजेच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. देशाच्या विजेची मागणी विविध वीज कंपनीच्या माध्यमातून भागविली जात असून मागणीपेक्षा निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. संपूर्ण देश वीज निर्मितीत स्वयंपूर्ण आहे, अशी माहिती मुख्य महाव्यवस्थापक श्रीनिवासन राव यांनी दिली. सोलापूर येथे एनटीपीसी मार्फत 1 हजार 320 मेगावॅट वीज निर्मिती होत असून त्यातील 50 टक्के वीज महाराष्ट्र राज्याला उपलब्ध करून दिली जाते तर लवकरच 23 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प ही एनटीपीसी निर्माण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राज्य वीज वितरण कंपनी व केंद्रशासनाच्या ऊर्जा विभागाकडून ऊर्जेच्या वापराच्या अनुषंगाने तसेच वीज बचतीबाबत व स्वयंपूर्ण बाबत निर्माण करण्यात आलेले लघुपट उपस्थित प्रेक्षकांना दाखवण्यात आले. यावेळी पथनाट्याच्या माध्यमातून ऊर्जा बचतीचा संदेश ग्राहकांना देण्यात आला तर वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना कशापद्धतीने सेवा देण्यात येते तसेच आपत्तीच्या प्रसंगात कर्मचारी कशा पद्धतीने संवेदनशीलता ठेवून काम करतात याविषयीची माहिती सांस्कृतिक कार्यक्रमातून दिली. त्यानंतर वीज वितरण कंपनीच्या वीज धोरणानुसार सवलतीची रक्कम वजा करून थकबाकीदार ग्राहकांनी 100% भरणा केला त्या ग्राहकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रारंभी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उज्वल भारत उज्वल भविष्य या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री. सांगळे यांनी प्रस्ताविक केले व वीज वितरण कंपनीकडून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देऊन त्या अंतर्गत ग्राहकांना दिलेल्या वीज जोडणीची माहिती सादर केली. या कार्यक्रमास वीज कर्मचारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
