दक्षिण सोलापूर .दि,१४(प्रतिनिधी )विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर वडकबाळजवळ झालेल्या विचित्र अपघातात भंडारकवठे येथील जीवन विकास प्रशालेतील प्रकाश नेहरु जंगलगी(वय-३८) या शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर प्रकाश आण्णाराव पाटील (वय-४५) हे गंभीर जखमी झाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की आज दहावीचा भूमितीचा पेपर होता पेपर सुटल्यावर भंडारकवठे येथील जीवन विकास प्रशालेतील सहशिक्षक प्रकाश पाटील आणि प्रकाश जंगलगी हे दोघे पेपर चेकिंगच्या कामासाठी मोटारसायकल वरुन सोलापूरकडे निघाले होते .वडकबाळजवळ येताच आयशर टेम्पोने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली, यात पाटील आणि जंगलगी गंभीर जखमी झाले . त्यांना सोलापूरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.उपचारादरम्यान प्रकाश जंगलगी यांचा दुर्दैवी अंत झाला . प्रकाश जंगलगी हे जीवन विकास प्रशालेत इंग्रजी विषयाचे शिक्षक होते. शाळेतील एक संयमी शांत स्वभावाचे शिक्षक हरपल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे ,जखमी झालेले शिक्षक प्रकाश पाटील यांची प्रकृती स्थिर असून सिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहे ,