सोलापूर- आजच्या काळात संवादची अतिशय गरज आहे. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वक्तृत्व तसेच विविध कार्यक्रमांची, स्पर्धांची गरज असते, असे मत पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी श्रेणिक शाह यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या हिंदी विभाग आणि बॅंक ऑफ़ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदी वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात शाह हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाषा व वांग्मय संकुलाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक अजय कडू हे उपस्थित होते.
शाह म्हणाले की, माणसाची उत्क्रांती झाली तेंव्हा, तो सांकेतिक भाषेत बोलत होता. पण त्याचा विकास होत गेला आणि भाषा निर्माण झाली. भाषा हेच व्यक्त होण्याचे आणि संवाद साधण्याचे माध्यम आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातूनच भाषा आणि विचार दोन्ही ची प्रभावी अभिव्यक्ती अनुभवास येते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. कोळेकर म्हणाले की, कोणताही उपक्रम करण्यासाठी राजाश्रय, लोकाश्रय आणि धनाश्रेय मिळतो. तेंव्हा या उपक्रमाला एक वेगळी उंची देता येते. म्हणून त्यांनी बॅंक ऑफ इंडियाचे सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच प्रत्येकाने आपापल्या भाषांचा अभिमान बाळगावा. इंग्रजीच्या न्यूनगंडातून बाहेर पडावे कारण मातृभाषेतूनच माणूस बोलून व्यक्त होऊ शकतो आणि आपली संस्कृती जतन करू शकतो, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाला बँक ऑफ इंडियाचे राजभाषा अधिकारी रमेश गच्छी, भाषा संकुलातील प्राध्यापक उपस्थित होते. उद्घाटनानंतर वक्तृत्व स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. स्पर्धेनंतर लगेच पारितोषिके वितरित करण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभला क्रीडा संचालक डॉ. एस के पवार उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेचा विषय ‘भारतीय नागरीकोंके कर्तव्यों की प्रासंगिकता एवम प्रभाव’ असा होता. स्पर्धेचा निकाल- या स्पर्धेत हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालयाची श्वेता झंवर हिने प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय क्रमांक पूजा खपाले, सोलापूर विद्यापीठ आणि तृतीय क्रमांक मयुरी वाघमारे हिने पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिके स्मिता गदगे, सोलापूर विद्यापीठ, मेंदू उजमा फारूक, सोशल कॉलेज सोलापूर, शिवराज मिटकरी यांनी मिळवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनंत वडघणे यांनी केले तर आभार प्रा. गणेश संकपाळ यांनी मानले.