सोलापूर : परमेश्वराने निर्माण केलेली कोणतीही गोष्ट ही निरुपयोगी नाही. प्रत्येकाला खास करुन महिलांना वेगवेगळ्या हेतूने परमेश्वराने जन्माला घातले आहे. महिलांकडे अनेक कलागुण आहेत. आज इतक्या महिलांना मोठ्या संख्येत एकत्रित आणणे, त्यांना व्यासपीठ, बाजारपेठदेखील मिळवून देणे हे काम लोकमंगल फाउंडेशनच करू शकते. लोकमंगल समूहाने खर्याअर्थाने महिलांना जगण्याचे साधन आणि सन्मान मिळवून दिला आहे, असे प्रतिपादन सिने अभिनेत्री प्राची गोडबोले यांनी केले.
लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने गोविंदश्री मंगल कार्यालयात महिला दिनानिमित्ताने आयोजित महिला बचत गट प्रदर्शन आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. प्रास्ताविकात मीरा शेंडगे यांनी लोकमंगल समूहाचे कार्य आणि पुरस्कार देण्याचा हेतू स्पष्ट केला. यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच महिलांचा साडी आणि चोळीचा आहेर देऊन प्राची गोडबोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये अक्कलकुवा येथील पं.स.सभापती रुषा रामसिंग वळवी, सक्षम दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संचालिका मंजुश्री गोविंद कुलकर्णी, एकल महिला किसान संघटनेच्या संयोजक कविता विजयराव ढोबळे, संगणकतज्ज्ञ अंकिता अशोक नगरकर आणि सोलापुरातील पहिल्या रिक्षा चालक महिला शोभा रामचंद्र घंटे यांचा समावेश होता.
पुढे बोलताना प्राची गोडबोले म्हणाल्या की, विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांना शोधून काढणे म्हणजे नेमके हिरे शोधून काढण्याचे काम आहे. हे काम लोकमंगलने केले आहे. या पुरस्कार प्राप्त महिलांचा सन्मान करताना मला माझाच सन्मान झाला आहे , असे वाटते. त्यामुळे लोकमंगल समूहाला सर्व मंगल समूह म्हटले पाहिजे. लोकमंगलचा हा आदर्श इतरांनीही घेण्यासारखा आहे असेही गोडबोले म्हणाल्या. यावेळी पुरस्कार प्राप्त महिलांनीही आपले मनोगत व्यक्त करून लोकमंगल समूहाचे आभार मानले. या कार्यक्रमाला लोकमंगलच्या संचालिका रेणुका महागावकर, सीमा किणीकर, अनिता शेळके, नगरसेविका राजश्री चव्हाण, पुष्पांजली काटीकर, अंबिका पाटील, अनिता जगदाळे, वरलक्ष्मी पुरुड, अलका देवाडकर, शुभांगी भोसले, पुरस्कार समिती सदस्य मीरा शेंडगे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ऐश्वर्या हिबारे यांनी केले.