सोलापूर : कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक गोरगरिब कुटुंबांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे त्यांना अन्नधान्य मिळणे मुष्कील झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर रा.स्व. संघ जनकल्याण समिती सोलापूर जिल्ह्याच्यावतीने संघ रचनेतील सोलापूर जिल्हा म्हणजे सोलापूर शहर आणि उत्तर, दक्षिण, अक्कलकोट, मोहोळ, बार्शी या पाच तालुक्यातील सुमारे 5 हजार कुटुंबांना 15 दिवसाचे अन्नधान्य मोफत घरपोच देण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी शहर संघचालक राजेंद्र काटवे यांच्या हस्ते मोजक्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीत एका कुटुंबाला धान्याचे हे कीट देण्यात आले. शिवस्मारक प्रांगणात हा कार्यक्रम झाला. त्यानंतर आता हे हे धान्याचे कीट घरोघरी वाटप करण्यास सुरूवात करण्यात आली आहे, अशी माहिती रा.स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह संतोष कुलकर्णी यांनी दिली.
दोन वाहने, चार स्वयंसेवकांना परवानगी
या किट वाटपासाठी पोलिस आयुक्तांनी दोन वाहने, त्या वाहनाचे चालक आणि चार स्वयंसेवकांना परवानापत्रही दिले. एका वाहनावर दोन स्वयंसेवक आणि एक चालक एवढयाच मोजक्या स्वयंसेवकांवर ही जबाबदारी देण्यात आली. हे स्वयंसेवक रा.स्व. संघाचे सोलापूर शहरात दहा नगरे आहेत. त्या प्रत्येक नगराच्या नगर कार्यवाह यांनी मागणी केलेली आहे तेवढे कीट हे गाडीवरील परवानापत्र असलेले स्वयंसेवक पुरवतील आणि संबंधिन नगर कार्यवाह आपल्या भागातील गरजूंची जी यादी केली आहे त्या प्रत्येक कुटुंबाच्या घरी हे कीट पोहोचवत आहेत. या अशा उत्कृष्ट नियोजनामुळे सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून हे किट वाटप करण्यास प्रारंभ झाला आहे.