दरवर्षी रायगडावर अत्यंत उत्साहात, जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. यंदा मात्र करोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
“करोना महामारीचे संकट पाहता समाजहीत डोळ्यासमोर ठेवून शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे नियोजन केले आहे. सोहळा साधेपणाने साजरा होईल” असे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
अखिल भारतीय राज्याभिषेक समितीच्यावतीने दरवर्षी ६ जूनला दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. या निमित्ताने देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर हजेरी लावतात. समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. शिवभक्तांच्या सहकार्याने २००८ साली मेघडंबरीत शिवछत्रपतींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना झाली.