सोलापूर : सोलापूर शहरातील यंत्रमाग व गारमेंट उद्योग सुरू करण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिली.
गारमेंट, यंत्रमाग असोसिएशनची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात पालकमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस उपायुक्त बापू बांगर आदी उपस्थित होते.
यावेळी गारमेंट असोसिएशनचे प्रतिनिधी रामवल्लभ जाजू, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, अमित जैन, राजेंद्र कुचन, प्रकाश पवार यांनी सोलापुरात गारमेंट व यंत्रमाग उद्योग सुरू करण्याची मागणी केली. सोलापुरातील गारमेंट व यंत्रमाग उद्योग अडचणीत असून कामगारांच्याही अडचणी वाढल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना आणि लॉकडाउनचे सर्व नियम पाळून उद्योग सुरू करण्याची मागणी यावेळी प्रतिनिधींनी केली. यावेळी पालकमंत्री भरणे यांनी गारमेंट व यंत्रमाग उद्योजकांच्या अडचणी जाणून घेत यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.