मोहोळ/दादासाहेब गायकवाड : पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिलेशी ओळख निर्माण करून त्यातुन लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केल्याप्रकरणी पेनूर ता. मोहोळ येथील चंद्रकांत अशोक शेंबडे या होमगार्ड वर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला पोलीस कर्मचार्याने याबाबतची फिर्याद दिली आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर ग्रामीण पोलिस दलामध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी २०१९ मध्ये गणेशोत्सवाच्या बंदोबस्त दरम्यान चंद्रकांत शेंबडे या होमगार्डचा संपर्क आला. संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी चंद्रकांत याने ओळख वाढवून मैत्री केली. त्यातून प्रेमात रूपांतर करून लग्नाचे आमिष दाखवून दि. १ सप्टेंबर २०१९ ते २६ ऑक्टोंबर २०१९ दरम्यान लोणावळा, पुणे शहर तुळजापूर याठिकाणी आणि हॉटेल वर नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वारंवार संबंधित महिलेने लग्न कधी करायचे असे विचारले असता चंद्रकांत टाळू लागला. फोन उचलत नव्हता याबाबत त्याला विचारणा केल्यानंतर मी तुझ्या सोबत लग्न करू शकत नाही माझे घरचे काय म्हणतील असे म्हणून टाळू लागला. यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात होमगार्ड चंद्रकांत शेंबडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.