नवी दिल्ली : भारत आणि चीनदरम्यान निर्माण झालेल्या तणावावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारने या मुद्द्यावर मौन पाळल्याचे सांगत त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सीमेवर निर्माण झालेल्या तणावावर सरकारने मौन बाळगले असून चीनला अनेक अटकळी बांधण्याची संधी मिळाली आहे. तसेच या संकटाच्या काळात अनिश्चितताही वाढत आहे, असे म्हणत नेमके काय घडत आहे, हे सरकारने देशातील जनतेला सांगितले पाहिजे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
पूर्व लडाखच्या पेगाँग क्षेत्रात ५ मे या दिवशी भारत आणि चीनच्या सुमारे २५० सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. दोन्ही बाजूंनी दगडफेकही झाली होती. या घटनेत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले होते. या बरोबरच दुसऱ्या एका घटनेत सिक्कीम सेक्टरमध्ये ९ मे या दिवशी भारत-चीनच्या १५० सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. त्यानंतर सीमेवर दोन्ही देशांनी आपल्या सैनिकांच्या संख्येत वाढ केली.
गलवानच्या आसपासच्या परिसर हा दोन्ही देशांमधील गेल्या ६ दशकांपेक्षाही अधिक काळापासूनचा संघर्षाचे कारण बनले आहे. सन १९६२ मध्ये देखील या परिसरावरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. गलवान खोऱ्यामध्ये चीनने सुमारे ४० ते ५० तंबू उभारले. त्यानंतर भारताने सीमेवर अतिरिक्त सैनिक पाठवले, अशी माहिती सूत्रांनी दिले. भारत आणि चीनदरम्यानच्या या तणावाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या समस्येच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची तयारीही दर्शवली आहे. दोन्ही देशांदरम्यानच्या संघर्षादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मूड ठीक नसल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत.