येस न्युज मराठी नेटवर्क : १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज निकाल दिला. बाबरी मशीदप्रकरणी निकाल येणार असल्याने संपूर्ण देशाचं निकालाकडे लक्ष लागलं होतं.
या प्रकरणात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी होते. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी १६ सप्टेंबरला सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आरोपींमध्ये उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा यांचाही समावेश आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने न्यायालयापुढे ३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केले होते. ४८ जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते मात्र त्यापैकी १६ जण खटला सुरु असताना मरण पावले. १६ व्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली असा सीबीआयचा युक्तिवाद होता.