- प्रबोधन मंच, भा.म.संघ, भारत विकास परिषदेतर्फे आयोजन
- स्वा. सावरकर सध्याच्या संदर्भात पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
सोलापूर : सोलापूरच्या भारत विकास परिषद, प्रबोधन मंच आणि भारतीय मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्तीसगड येथील गुरू घासीदास केंद्रीय विश्व विद्यालयाचे कुलाधिपती आणि 104 विविध शोधनिबंध आणि 40 पुस्तकांचे लेखक, माजी आमदार डॉ. अशोक गजानन मोडक यांची सोलापुरात रविवार 16 आणि सोमवार 17 फेब्रुवारी असे दोन दिवस व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. तसेच डॉ. मोडक यांनी लिहिलेल्या “स्वातंत्र्यवीर सावरकर सध्याच्या स्थितीत’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनही 16 फेब्रुवारी रोजीच्या व्याख्यानाच्यावेळी होणार आहे, अशी माहिती भारत विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. महादेव न्हावकर, प्रबोधन मंचचे जिल्हा निमंत्रक चन्नवीर बंकूर आणि भा.म. संघाचे सरचिटणीस भारत तांबोळकर यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत दिली.
- रविवार 16 फेब्रुवारी रोजी स्वा. सावरकरांवर व्याख्यान
डॉ. अशोक मोडक यांनी लिहिलेल्या “स्वा. सावरकर सध्याच्या संदर्भात’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवार 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता शिवस्मारक सभागृहात भागवताचार्य वा.ना. उत्पात यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डॉ. मोडक यांचे “स्वातंत्र्यवीर सावरकर सध्याच्या संदर्भात’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. भारत विकास परिषद आणि प्रबोधन मंच सोलापूर यांच्यावतीने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
- 17 फेब्रुवारीला स्व. ठेंगडी यांच्या कार्यावर व्याख्यान
सोमवार 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता शिवस्मारक सभागृहात डॉ. अशोक मोडक यांचेच “स्व. दत्तोपंत ठेंगडी : मौलिक चिंतन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. स्व. दत्तोपंत ठेंगडी कामगार क्षेत्रातील एक विचारवंत, कामगार चळवळीला एक प्रकारची दिशा देणारे व्यक्तीमत्त्व होते. स्व. दत्तोपंत ठेंगडी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्या निमित्ताने हे व्याख्यान होत आहे. भारतीय मजदूर संघ आणि प्रबोधन मंच यांच्यावतीने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सोमवारी विद्यापीठात व्याख्यान
डॉ. अशोक मोडक हे छत्तीसगड येथील गुरू घासीदास केंद्रीय विश्वविद्यालयाचे कुलाधिपती आहेत. व्याख्यानाच्या निमित्ताने ते सोलापूरला येत आहेत. त्यामुळे सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातही विद्यार्थ्यांसाठी त्यांचे “भारतासमोरील वैश्विक आव्हाने आणि भारतीय चिंतन’ या विषयावर सोमवार 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता व्याख्यान होणार आहे.
तरी नागरिकांनी सोलापुरात होणाऱ्या व्याख्यानास आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहनही तिनही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस दत्तात्रय आराध्ये, नितीन कवठेकर, संतोष कुलकर्णी, भारत तांबोळकर आदी उपस्थित होते.