सोलापूर- ( प्रतिनिधी ) – सोलापूर शहराच्या विकासाची वाट लावणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेने जुनी मिलच्या शेकडो कोटींच्या जागेवर अक्षरशः पाणी सोडले असून महानगरपालिकेने स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत स्वतःला आर्थिकदृष्टया दिवाळखोरीत लोटून घेतले असल्याचा घणाघाती आरोप जुनी मिल कामगार संघर्ष समितीचे संस्थापक नेते कुमार करजगी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला आहे.
कुमार करजगी म्हणाले,सन १८६५ साली सोलापूर शहराच्या मध्यवर्ती आणि मोक्याच्या ठिकाणी जुनी मिलच्या जागेत आशिया खंडातील सर्वात मोठ्या कापड मिलची स्थापना झाली. मात्र स्वार्थी कामगार पुढाऱ्यांच्या अरेरावीच्या वागण्यामुळे मिलच्या मालकांनी १९६३ साली मिल बंद केली. परिणामी मिलकडील येणे वसुली करण्यासाठी उच्च न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने मिलची मालमत्ता विकून देणी देण्यासाठी कोर्ट रिसीव्हरची नेमणूक केली. त्यानंतर कोर्ट रिसीव्हरने मिलची मशिनरी व इतर मालमत्ता विकून बँक आणि इतर देणी दिली.
दरम्यान शहराच्या मध्यवस्तीत शिल्लक राहिलेली मिलची १३६ एकर मोकळी जमीन शहराचा विकास होण्यासाठी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी मिलच्या या जागेवर स्टेडियम,हॉस्पिटल,बस टर्मिनल,हायस्कुल,शाळा,खेळाचे मैदान,मनपा सेवकांसाठी निवासस्थान,आदी विविध आरक्षणे १९७८ साली टाकली.शहराच्या विकासाचा विचार करून शासनाने नगरविकास व सार्वजनिक आरोग्य खात्याची अधिसूचना क्रमांक टी,पी,एस,१७७६/३२७९,यु. डी. ५,दिनांक १६ जानेवारी १९७८ अन्वये मंजूर केली आणि ती १ मार्च १९७८ पासून अमलात आली .
जुनी मिलची मोक्याची १३६ एकर जागेवर आरक्षण असल्यामुळे आणि सदर न्यायालयातील या मिलच्या सूच. क्र . १५६/६३ मध्ये शासन अटी असल्यामुळे मिलची हि जागा शहराच्या विकासासाठी महापालिकेस मोफत मिळणार असल्याची कुणकुण लागताच सोलापुरातील काही राजकीय मंडळींनी १९८५ साली सदरची जागा महापालिकेस न मिळता आपणास मिळावी या स्वार्था पोटी महापालिकेच्या सभागृहात अनेक बेकायदेशीर ठराव करून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे महानगरपालिकेचे शेकडो कोटींचे नुकसान झाल्याचे कुमार करजगी यांनी सांगितले.
पावणेदोन कोटीत जागा हडप करण्याचा डाव उधळला — जुनी मिलची १३६ एकर शेकडो कोटींची जागा महापालिकेला मोफत मिळत आहे,याची कल्पना महापालिकेतील राजकीय मंडळींना होती. परंतु सदरची मोक्याची हि जागा महापालिकेला न मिळता ती सर्व आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न झाले.इतकेच नव्हे तर यासाठी शहरातील काही बिल्डर व भांडवलदार मंडळींना एकत्र करून मिलची शेकडो कोटींची जागा फक्त १ कोटी ७० लाखांमध्ये हडप करण्याचा डाव राजकीय मंडळींचा होता. मात्र हा डाव उधळून लावण्यात यशस्वी झालो.महापालिकेच्यावतीने न्यायालयात खोटी शपथपत्र देऊन मिलच्या काही जागा स्वतःच्या संस्थेसाठी लाटल्या असल्याचे कुमार करजगी यांनी सांगितले.
तर … आज महापालिका मालामाल झाली असती —
वास्तविक पाहता महापालिकेत निवडून राजकीय मंडळींनी त्यावेळी आपला स्वार्थ पाहिला नसता तर १०० कोटींची जुनी मिलची १३६ एकर जागा त्यावेळी महापालिकेला फक्त ५ कोटींमध्ये मिळाली असती. आज त्याच जागेची किंमत हजारो कोटींच्या घरात आहे. मिलची जागा जर महापालिकेच्या मालकीची झाली असती तर आज महापालिका मालामाल झाली असती शिवाय पालिकेला दरमहा सुमारे ५ ते १० कोटींचे उत्पन्न मिळाले असते, असे करजगी म्हणाले.
मनपाने जागेच्या नोटीसीकडे दुर्लक्ष केल्याचा फटका —
जुनी मिलची जागा विकासाच्या योजना राबविण्यास घेण्यासाठी १९९७ व २००१ साली महापालिकेला
विनंती करण्यात आली होती. २००१ सालात या जागेची किंमत २०० कोटी रुपये होती. ती जागा न्यायालयात भरलेल्या फक्त १० कोटींमध्ये घेण्यासाठी नोटीस दिलेली असतानासुद्धा महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष करून कोट्यवधींच्या जागेवर पाणी सोडले. याबाबाबत महापालिकेतील स्वार्थी राजकारणी मंडळींनी केलेले बेकायदेशीर ठराव महापालिकेला आर्थिकदृष्टया खाईत नेण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोपही कुमार करजगी यांनी केला आहे.