सोलापूर, दिनांक :- जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांना ग्रंथालय उपलब्ध नाही अशा सर्व शाळांची यादी शिक्षण विभागाने तयार करून ग्रंथालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. या सर्व शाळांना ग्रंथालयासाठी किमान शंभर पुस्तके तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 व 23-24 चा जिल्हा परिषद यंत्रणांच्या विविध विभागांच्या आढावा प्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, महसूल उप जिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, सहायक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेमध्ये एक चांगले ग्रंथालय असणे आवश्यक आहे त्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांसाठी आवश्यक विविध प्रकारचे पुस्तके असावीत. यासाठी शिक्षण विभागाने शाळेच्या मुख्याध्यापकांना तात्काळ किमान शंभर पुस्तकाची यादी तयार करण्यास कळवावे व ती सर्व पुस्तके आपण स्वतः तात्काळ खरेदी करून देणार असून प्रत्येक शाळेत ग्रंथालय सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ती पुस्तके शाळेत तसेच वाचण्यासाठी घरी रोटेशन पद्धतीने घेऊन जाण्याची परवानगी द्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या 35 शाळा महापालिकेच्या हद्दपार भागात आलेले आहेत त्या सर्व शाळांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आवश्यक असल्याने नियोजन समितीमध्ये तात्काळ उपलब्ध करण्यात येईल असे पालकमंत्री पाटील यांनी सांगून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील किमान दोन भाषा एकूण 22 शाळांमध्ये दहा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करावे त्यासाठी आवश्यक असलेला प्रति शाळा दीड ते दोन लाखाचा निधी तसेच जिल्ह्याच्या प्रत्येक शाळेत ,स्वच्छतागृह व अन्य पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सीएसआर फंडातून उपलब्ध केला जाईल.
जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 च्या कामांचे कार्यारंभ आदेश माहे ऑक्टोबर 2023 अखेर तर सन 2023-24 ज्या कामांचे कार्यारंभ आदेश डिसेंबर 2023 अखेरपर्यंत देण्यात यावेत. माहे जानेवारी 2024 अखेर लोकसभेसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे तर नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मध्ये ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांना मंजूर असलेल्या निधीतून कामांची प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्यक असल्याने संबंधित यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या प्रत्येक यंत्रणेने नियमित कामाव्यतिरिक्त नियोजन समितीच्या निधीमधून आपल्या विभागांतर्गत विकासाची कामे कशा पद्धतीने करावयाची याचा स्वतंत्र कृती आराखडा असला पाहिजे. शासकीय यंत्रणेने प्रस्तावित केलेली कामे गतीने विहित कालावधीत पूर्ण केल्यास त्याचा लाभ सर्वसामान्य लाभार्थ्यांना मिळतो, त्यामुळे त्याचा फायदाही शासनाला होत असतो. त्यासाठी प्रत्येक विभागाने दक्षता घेऊन कामे करावीत, असे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले.
प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 माहे मार्च 2023आखेर झालेल्या खर्चाची माहिती बैठकीत सादर केली. यामध्ये सर्वसाधारण योजना खर्च 526 कोटी 81 लाख, अनुसूचित जाती उपायोजना खर्च 150 कोटी 65 लाख, आदिवासी क्षेत्राबाहेर उपाय योजना खर्च 4 कोटी 21 लाख असा एकूण 99.85% निधी खर्च झाल्याची माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्व यंत्रणांनी जिल्हा नियोजन समितीतून मिळालेल्या निधी अंतर्गत प्रास्तावित कामांची माहिती सादर केली. त्यामध्ये पशुसंवर्धन, आरोग्य, समाज कल्याण, सार्वजनिक बांधकाम, ग्रामपंचायत, महिला व बालविकास आदी विभागाची माहिती देण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषद जिल्हा परिषद जिल्हा वार्षिक योजना सन 2022- 23 व 23 -24 अंतर्गत मंजूर असलेला सर्व निधी विहित कालावधीत 100% खर्च करेल याबाबत आश्वासित केले. प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्याचे कॉपी टेबल बुक देऊन स्वागत करण्यात आले.