छत्रपती शाहु महाराज युवा शक्ती करियर व मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर : स्वतःमधील क्षमता जाणून घेऊन, त्या विकसित करण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करा. या प्रयत्नांमध्ये स्वतःमधील उणिवांचा अडथळा होवू देवू नका, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.
कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित छत्रपती शाहु महाराज युवा शक्ती करियर व मार्गदर्शन शिबिराच्या उदघाटन सत्राचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, प्रख्यात चित्रकार सचिन खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नोकरीच्या मागे न लागता विविध व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करुन नोकरी देणारे बना, असा सल्ला देशमुख यांनी दिला, तर व्यावसायिक नैतिकता व सामाजिक जाणीव जोपासण्याचे आवाहन ठोंबरे यांनी केले.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने विजापूर रोड स्थित गंगा लॉन्स येथे घेण्यात आलेल्या या एक दिवसीय शिबिरात प्रा. आय. आय. मुजावर, प्रा. ए. आय. यत्नाळ, प्रा. बी. जे. पाटील यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या शिबिरात विद्यालयीन अभ्यासक्रम / प्रवेश प्रक्रिया /कलमापन चाचणी /शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना विषयक माहिती / करियर प्रदर्शन याबाबत मार्गदर्शन करून उपयुक्त माहिती देण्यात आली. या शिबिरादरम्यान विविध शैक्षणिक संस्था, व्यावसायिक संस्था, अर्थसहाय्य करणाऱ्या विविध संस्थांनी माहिती देणारे स्टॉल्स उभारलेले होते. या स्टॉल्सना उपस्थित विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रास्ताविक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस. आर. भालचिम यांनी तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था विजापूर रोड सोलापूरचे प्राचार्य एम. एस. उडाणशिवे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य, ए. के. जाधव यांच्यासोबत संस्थेतील सर्व गटनिदेशक, निदेशक व सर्व कर्मचारी वृंद यानी विशेष प्रयत्न केले. रादरच्या कार्यक्रमास औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, १० वी / १२ वी उत्तीर्ण उमेदवार व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


