विद्यापीठाच्या ऑनलाईन युवा महोत्सवास प्रारंभ
सोलापूर, दि.6- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव म्हणजे युवा विद्यार्थी कलावंतांच्या उत्साह, जोश आणि आनंदाला उधाण येते. कोविड संकटामुळे हा महोत्सव ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. युवा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला तसेच कलागुणांना चालना मिळते आणि यातूनच उत्कृष्ट कलाकार निर्माण होण्यास मदत होते, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले.
सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सन 2020-21 च्या सतराव्या युवा महोत्सवाचे ऑनलाइन उद्घाटन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचे हस्ते झाले, यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. वसंत कोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले.
कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, कोविड संकटामुळे ऑनलाइन पद्धतीने युवा महोत्सव घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये एकल कलाप्रकारांचा समावेश करण्यात आला. जेणेकरून विद्यार्थ्यांना घरूनच कलाप्रकार सादरीकरणाची संधी मिळावी. विद्यार्थ्यांचा याला चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी चांगली तयारी केली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या ऑनलाइन युवा महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण कलाप्रकार सादरीकरण करण्यावर भर द्यावा. सर्वात चांगली प्रस्तुती करावी. बक्षीसाची अपेक्षा करण्यापेक्षा उत्कृष्ट सादरीकरण कसा होतो, यावर अधिक भर देणे आवश्यक आहे. यातूनच भरपूर काही शिकायला मिळते आणि पुढे जाऊन आपण उत्कृष्ट कलाकार होतो, असा विश्वास कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
युवा महोत्सवात 40 महाविद्यालयातील 350 विद्यार्थ्यांचा सहभाग असून एकूण 16 कलाप्रकारांचे सादरीकरण यात होत आहे. नृत्य, ललित, गायन आणि वांग्मय अशा चार विभागात कलाप्रकारांची वर्गवारी करण्यात आली आहे, त्यानुसार कलाप्रकारांचे सादरीकरण होत आहे. विद्यार्थी आपल्या घरी राहूनच दिलेल्या लिंकवर विहित वेळेत आपल्या कलाप्रकारांचे सादरीकरण करीत आहेत. सोमवारी मराठी वक्तृत्व, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय गायन, स्थळचित्रण या स्पर्धा पार पडल्या. वांग्मय विभागाचे नियोजन देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी कॉलेज यांच्याकडून, नृत्य विभागाचे नियोजन वसुंधरा कला महाविद्यालय, गायन विभागाचे नियोजन विद्यापीठ कॅम्पसमधील ललित कला व कला संकुलाडून तर ललित विभागाचे नियोजन संगमेश्वर महाविद्यालयाकडून होत आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी मानले. युवा महोत्सवात सादर होत असलेल्या ऑनलाइन कार्यक्रमासाठी डॉ. श्रीराम राऊत आणि त्यांच्या पथकाचे तंत्रसाहाय्य लाभले.