सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून ‘जी ट्वेंटी अंतर्गत युवा संवाद-2047’ या उपक्रमाचे आयोजन शनिवार, दि. 22 जुलै 2023 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 यावेळेत करण्यात आल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांनी दिली.
सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाच्या उद्घाटनास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार युवा विद्यार्थ्यांचा लोकप्रतिनिधीशी संवाद व्हावा तसेच 2047 पर्यंत भारत विकसित देश होईल, त्या दृष्टीने युवा पिढीला वाटचाल करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील एक हजार विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी डॉ. गौतम कांबळे यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात बैठक घेऊन विविध समितीच्या समन्वयकांना सूचना करून त्यांच्याकडून आढावा घेतला. यावेळी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. चार सत्रामध्ये हा कार्यक्रम होणार असून लोकप्रतिनिधींच्या संवादासोबतच विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन देखील विद्यार्थ्यांना लाभणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे व जिल्हा समन्वयक डॉ. वीरभद्र दंडे हे समिती व समन्वयकांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत.