मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षाचा राज्यस्तरीय शुभारंभ
सोलापूर :- देशातील आणि राज्यातील महिला युवती सक्षम झाल्या पाहिजेत त्यांना त्यांचे स्वसंरक्षण करता आले पाहिजे ही काळाची गरज निर्माण झाली आहे म्हणून राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण अभियान सुरू केले आहे. यामध्ये मोठ्याप्रमाणात युवतींनी सहभाग घ्यावा असे आवाहन महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. केटरिंग कॉलेजच्या प्रांगणात सोमवारी सकाळी राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण अभियानाचा शुभारंभ सोलापूर मधून करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य, आ.विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, सचिन कल्याणशेट्टी, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, कुलगुरू कामत, पंकज पाठक,कृष्णा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी महिला बाल विकास अधिकारी उपस्थित होते.
शिक्षण आणि नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडलेल्या महिला युवतींना सुरक्षितता वाटावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याची योजना तयार करण्यात आली. त्यानुसार राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण अभियान राज्यातील 22 ठिकाणी होत असून त्याचा शुभारंभ सोलापूर मधून करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रारंभी राज्यातील प्रत्येक तालु्नयातील 1 हजार युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या तीन लाख 50 हजार युवर्तीना प्रशिक्षण दिले जाणार आहे पुढे याची संख्या वाढवून जवळपास 35 लाख युवतींना याचे प्रशिक्षण देण्याचा संकल्प करण्यात आल्याचे नामदार मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर योजनेच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर सोलापूर शहर जिल्ह्यातील जवळपास 10 महाविद्यालयातून आलेल्या युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले त्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवण्यात आले. या युवती प्रशिक्षणाला मोठ्याप्रमाणात महिला व युवतींनी प्रतिसाद दिला.