ॲडजंट प्रोफेसर म्हणून बऱ्हाणपुरे यांना विद्यापीठाकडून ऑफर
सोलापूर – येथील युवा संशोधक अभियंता राहुल बऱ्हाणपुरे यांनी वाहनांमधील 30 टक्के इंधन प्रदूषण कमी करणारा पार्ट विकसित केलेला असून सदरील पार्ट व त्याचे पेटंट टाटा मोटर्सकडून तब्बल साडे तेरा कोटी रुपयांस खरेदी करून सोलापूरचा मान उंचावला आहे, याबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे अभियंता राहुल बऱ्हाणपुरे यांचा सन्मान करण्यात आला.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते राहुल बऱ्हाणपुरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणीक शहा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठता डॉ. लक्ष्मीकांत दामा, डॉ. विकास पाटील, डॉ. गौतम कांबळे, डॉ. सचिन लड्डा, डॉ. केदारनाथ काळवणे, डॉ. अंजना लावंड, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. राजेंद्र वडजे आदी उपस्थित होते.
यावेळी राहुल बऱ्हाणपुरे यांनी विकसित केलेला पार्ट व त्याच्या पेटंटबद्दल बोलताना म्हणाले की, एमसीवीसीचे शिक्षण घेतल्यानंतर वर्कशॉपमध्ये प्रत्यक्ष काम करताना ही कल्पना मनात आली व 2011 पासूनच कामाला लागलो. सध्याच्या वाहनांमध्ये ‘इजीआर’ सिस्टीमचा वापर केला जातो. या पार्टचे काम प्रभावी होण्यासाठी ‘पीसीएम’ या सेंसरद्वारे हा पार्ट नियंत्रित केला जातो. सायलेन्सरमधून बाहेर फेकली जाणारी 30 टक्के दूषित हवा या पार्टमुळे पुन्हा रिसायकल होऊन इंजिनमध्ये सोडले जाते. त्यामुळे प्रदूषणात तेवढीच घट होणार असून दहा टक्के इंधनाची देखील बचत होते. नायट्रोजन, कार्बन डाय-ऑक्साइड, हायड्रोकार्बन असे घातक वायू वाहनांमधून उत्सर्जित होतात. त्यातील नायट्रोजन ऑक्साईड हा खूपच घातक मानला जातो. त्याचे प्रमाण कमी करण्यात हा पार्ट महत्त्वाचा असणार आहे. हा पार्ट बनवायला तेरा वर्षे लागले. त्यानंतर पेटंट पब्लिश झाल्यानंतर तीन कंपन्यांकडून मागणी आली. शेवटी टाटा मोटर्सचे देशभरात सामाजिक योगदान पाहता त्यांना हा पेटंट दिल्याचे त्यांनी राहुल बऱ्हाणपुरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना प्रभारी कुलगुरू डॉ. कामत म्हणाले की, अतिशय कठीण परिस्थितीतून युवा संशोधक अभियंता राहुल बऱ्हाणपुरे यांनी हा पार्ट विकसित करून संशोधनाची व्याप्ती व्यावसायिक पातळीवर नेऊन ती जागतिक स्तरावर पोहोचवली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांनी विकसित केलेला हा तंत्रज्ञ निश्चितच शाश्वत विकासासाठी बळ देणारा आहे. विद्यार्थी दशेत त्यांनी केलेले हे संशोधन निश्चितच सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी रोल मॉडेल ठरणारे आहे. यामुळे नव्या शैक्षणिक धोरणानुसार प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस अथवा ॲडजंट प्रोफेसर म्हणून त्यांना आपण विद्यापीठासाठी काम करण्यासंदर्भात ऑफर देणार आहोत, त्यांनी त्याचा स्वीकार करावा, असे विनंती देखील प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांनी केली आहे.