सोलापूर :- सी. ए. च्या अखिल भारतीय परीक्षेत सोलापूरच्या सहा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून सोलापूरचे नाव उज्वल केले आहे. या गुणवान विद्यार्थ्यांनी आता आपला व्यवसाय करताना सोलापूरच्या विकासाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले. या विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कार समारंभात ते बोलत होते.
सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या वतिने या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. फाऊंडेशन जनसहभाग, विकास आणि समृद्धी या तीन सूत्रांवर काम करते आणि सोलापुरात विविध क्षेत्रात दिसत असलेल्या गुणवत्तेला पुढे आणण्याचा प्रयत्न करतेे. त्याचाच भाग म्हणून हा सत्कार करण्यात आला. सी. ए. च्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी अनुश्री सोनी, ऐश्वर्या सोनी, सोमशेखर शेटे, प्रणव पाये, अतिया शेख आणि प्रियंका कोलार हे आहेत.
या सत्कार समारंभात सोशल फाऊंडेशनचे सल्लागार डॉ. नरेन्द्र काटीकर,संचालक मयुरी वाघमारे, समर्थ बँकेचे मिहीर सोलापूरकर आणि सी.ए. असोसिएशनचे अध्यक्षा नीलशा नोगजा यांची उपस्थिती होती. सोशल फाऊंडेशनची ट्रॉफी, श्रीमंती सोलापूरची आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. काटीकर यांनी प्रास्ताविक केले.