सोलापूर – महिलांनी उमेद अभियानच्या सौजन्याने वेगवेगळे व्यवसाय करून आर्थिकदृष्या सक्षम व्हावे त्यासाठी मी तुमच्या पाठीमागे उभी असेन त्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे टाका मी तुमच्यासाठी दहा पाऊल पुढे येईन असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले.
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहानी केलेल्या उत्पादनाचे प्रदर्शन व विक्रीसाठी आयोजित केलेल्या रुक्मिणी दिवाळी महोत्सवच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे हे उपस्थित होते.
बचत गटांनी उत्पादित केलेला सुकामेवा, हस्तकला साहित्य, फराळाचे पदार्थ व चॉकलेट, पणत्या, आकाश कंदील यांची खरेदी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः करून सर्व अधिकारी कर्मचारी यांना खरेदी करण्याचे आवाहन केले.
पुढे बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे म्हणाल्या की, उमेद अभियानाच्या माध्यमातून तयार केलेल्या उत्पादनाचे मार्केटिंग करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी पुढील काळात प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. सदर रुक्मिणी दिवाळी महोत्सव मध्ये सोलापूर जिल्ह्यातून नावीन्यपूर्ण उत्पादनाचे 25 स्टॉल लावण्यात आले आहेत.
सदर महोत्सव पार पाडण्यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे, जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव, मीनाक्षी मडीवळी, दयानंद सरवळे, अमोल गलांडे, शितल म्हता, तालुका अभियान व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक परिश्रम घेत आहेत.