येस न्युज मराठी नेटवर्क : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात वरिष्ठ अधिकार्यांसह कायदा आणि सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीत धार्मिक स्थळांवरील “बेकायदेशीर” लाऊडस्पीकर काढून टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रशासनाने मंगळवारपासून ध्वनिक्षेपक हटविण्याची कार्यवाही सुरू केली होती. त्यामध्ये सुमारे 11 हजार ‘बेकायदेशीर’ लाऊडस्पीकर काढले आहेत.
उत्तर प्रदेश सरकारच्या सूचनेनुसार आतापर्यंत धार्मिक स्थळांवरून 11 हजार ‘बेकायदेशीर’ लावलेले लाऊडस्पीकर हटवण्यात आले असून 35,000 लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला आहे अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी दिली आहे. धार्मिक स्थळांवर बेकायदेशीरपणे लावलेले लाऊडस्पीकर काढून टाकण्यासाठी आणि कायदेशीर लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यासाठी राज्यभर मोहीम राबवली जात आहे. याअंतर्गत बुधवारी (दि. 27 एप्रिल)रोजी दुपारपर्यंत 10923 लाऊडस्पीकर काढण्यात आले असून 35,221 लाऊडस्पीकरचा आवाज मर्यादेपर्यंत कमी करण्यात आला आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
या कारवाईबाबत माहिती देताना कुमार म्हणाले, “काढले जाणारे लाऊडस्पीकर अनधिकृत आहेत. जे लाऊडस्पीकर जिल्हा प्रशासनाची रीतसर परवानगी न घेता बसवले गेले आहेत किंवा परवानगी दिलेल्या संख्येपेक्षा जास्त लावले गेले आहेत त्यांना ‘अनधिकृत’ श्रेणीत वर्गीकृत करण्यात आले आहे. लाऊडस्पीकरबाबत उच्च न्यायालयाचे आदेशही विचारात घेतले जात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कायदा आणि सुव्यवस्था आढावा बैठकीत दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे ही कारवाई करण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी म्हणाले होते, की प्रत्येकाला त्यांच्या धार्मिक विश्वासानुसार पूजा आणि प्रार्थना करण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु लाऊडस्पीकरचा आवाज परिसराबाहेर जाऊ नये जेणेकरून इतर लोकांना कोणतीही अडचण येईल. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.