सोलापूर :शिवाजी सुरवसे आज आज सर्वात मोठा दिवस ..आजपासून सूर्याचे दक्षिणायन सुरू… शिवाय आज जागतिक योग दिन… या सर्व पार्श्वभूमीवर एकीकडे मान्सूनचे वारे वाहत असताना दुसरीकडे सत्तेचे मतलई वारे सुरू झाले आहे. देहू- आळंदी मध्ये टाळ-मृदुंगाचा ‘गजर’ सुरू झालाय.. प्रत्येकाला विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे तर दुसरीकडे राज्यात राजकीय ‘तमाशा’ सुरू झाला . ‘एकनाथाने’ बहु पक्षाला कामाला लावल्यामुळे सत्तेचा सारीपाट सुरू झाला आहे.
‘उद्धवा अजब तुझे सरकार’ असे म्हणत प्रत्येक जण आता महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या अपयशावर बोलू लागला आहे .त्यामुळे उद्धव ठाकरे किती दिवसांचे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची खेळी भाजपच्या पथ्यावर पडणार का याबाबत आखाडे मांडले जात आहे. आज बरोबर एक महिन्याने देशाला नवा राष्ट्रपती मिळणार आहे तत्पूर्वी एक महिनाभर अगोदरच महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार मधला ‘तमाशा’ जनतेसमोर आला आहे. त्यामुळे नवा राष्ट्रपती येण्यापूर्वीच महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळतो कि काय अशी देखील शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांवर या राजकीय खेळांचा खूप मोठा परिणाम होणार आहे .आजवर अनेकांनी मांडलेली गणित मोडून जाणार आहेत. राज्यसभा निवडणुकीत पाठोपाठ विधान परिषद निवडणुकीमध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरस्ट्रोक मारून चमत्कार घडविला मुळे महा विकास आघाडीला सुरुंग लागला आहे. ‘सुरतेवर स्वारी’ करून एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेला चांगलेच कोंडीत पकडले आहे. मान्सूनच्या पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला असला तरी राजकीय राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. एकीकडे ज्ञानोबा तुकोबांचा जयजयकार सुरू असताना ‘एकनाथा’ चे राजकीय ‘भारुड’ महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटस चे मात्र निश्चित सर्वत्र कौतुक सुरू झाले आहे. महा विकास आघाडी ला अडीच वर्ष पूर्ण झाली असताना राज्यसभेचे पाठोपाठ विधान परिषदेला देखील मतविभागणी झाल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये मोठी असंतोषाची लाट पसरली आहे. आता सरकार बदलणार ‘पुन्हा येईन”‘ म्हणणारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का या भीतीपोटी इतर पक्षात उड्या मारणारे देखील आता पुरते भयभीत झाले आहे. यामुळे अनेकांचे पक्ष प्रवेश आणि राजकीय भवितव्य धोक्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदुत्ववादी पक्ष असणाऱ्या शिवसेनेबरोबर आघाडी करून सत्ता स्थापन करू नये असे अडीच वर्षांपूर्वी वक्तव्य केले होते याचा फटका म्हणून त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात आले आणि आता शिवसेनेच्या शिंदेनी पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपबरोबर जाऊ असा सल्ला शिवसेनेला दिला आहे. काँग्रेसजनांनी सुशीलकुमार शिंदे यांचं अडीच वर्षापूर्वी ऐकलं असतं तर हे रामायण घडलं नसतं.. असं देखील आता बोलले जात आहे. 288 आमदार असणाऱ्या विधानसभेत एक जागा रिक्त असून दोन आमदार तुरुंगात आहेत. त्यामुळे 285 संख्याबळाचा विचार करता सत्ता स्थापन करण्यासाठी 144 आमदारांची गरज आहे. विधान परिषद निवडणुकीत चमत्कार घडल्यानंतर भाजपला हत्तीचं बळ मिळालं आहे शिवाय एकनाथ शिंदे यांनी सुरूंग लावल्यामुळे ही 144 ची फिगर गाठणे देवेंद्र फडणवीस यांना सहज शक्य आहे. एकनाथ शिंदे भाजप समवेत गेली तर महाविकास आघाडी बरखास्त होईल शिवाय अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी मुंबई महापालिका देखील भाजपच्या ताब्यात जाईल हे निश्चित. आजचा दिवस राज्यात अनेक अर्थांनी वेगळा ठरला. त्यामुळे सत्तेच गाजर भाजप चाखणार का याची उत्सुकता भाजपच्या राजकीय वारकऱ्यांना लागली आहे