येरमाळा : येथील प्रसिद्ध आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीची नारळी पौर्णिमा यात्रा शनिवार दि. ९ ऑगस्ट रोजी होत आहे. या यात्रेनिमित्त देवीच्या पालखीची गाव प्रदक्षिणा मिरवणूक निघणार असून, मंदिर परिसरात दुपारी ४ वाजता दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होणार आहे.
देवीच्या वर्षातून होणाऱ्या दोन यात्रांपैकी नारळी पौर्णिमा ही दुसरी यात्रा मानली जाते. या यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (आनंदधाम) येथे मंगळवार, ५ ऑगस्ट ते शुक्रवार, ९ ऑगस्ट या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहाची सुरुवात मंगळवारी सकाळी देवीचे मानकरी कै. आबाजी पाटील यांच्या आनंदधाम वाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा व महाअ- ारतीने होईल. गिरीश कुलकर्णी, विनोद कुलकर्णी आणि दत्तात्रय महाराज बोधले यांचे दररोज प्रवचन होणार आहे. तसेच भाग्यवान महाराज रोडगे, भूषण महाराज, बालाजी महाराज बोराडे आणि श्रीनिवास महाराज जगताप यांच्या कीर्तनांचे आयोजन करण्यात आले आहे. मलकापूर, येरमाळा, तेरखेडा, परतापूर, उंबरा, पानगाव, बाभळगाव, उपळाई, बांगरवाडी, कनेरवाडी येथील भजनी मंडळे हरिजागर सादर करणार आहेत. शुक्रवार, दि. ८ रोजी देवीची पालखी मुख्य मंदिरातून मानकरी कै. आबाजी पाटील यांच्या आनंदधाम वाड्यात प्रस्थान करेल.
शनिवारी नारळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ११ वाजता पालखीची गाव प्रदक्षिणा सुरू होईल. टाळ-मृदंग, ढोलकी आणि संबळाच्या गजरात मिरवणूक निघेल. पालखी मंदिराच्या पायऱ्यांजवळ आल्यावर दत्तात्रय बोधले महाराज यांच्या हस्ते चिंचेच्या झाडावर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडेल. यानंतर पालखी मुख्य मंदिरात दाखल होईल. दुसऱ्या दिवशी पालखी नगरप्रदक्षिणेसाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात परत येईल. गावातील चौकाचौकातून मिरवणूक काढल्यानंतर पालखी पुन्हा आबाजी पाटील यांच्या वाड्यात येईल. तिथे आराधी गीत, भजनाची जुगलबंदी, भारूड व सोंग सादर झाल्यानंतर पालखीची आरती केली जाईल. त्यानंतर ती विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात येईल. तेथे आरती झाल्यावर महाप्रसाद वाटपाने नारळी पौर्णिमा यात्रेची सांगता होईल.