जळगाव : ‘त्यांनी मागून हल्ला केला, पुढून केला असता तर माझ्या यशने 3 जण तरी मारले असते’, अशी प्रतिक्रिया शहीद जवान यश देशमुखचे वडील दिगंबर देशमुख यांनी दिली आहे. जम्मू काश्मीर मधील श्रीनगर येथे 26 नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. या घटनेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील यश देशमुख हा जवान शहीद झाला आहे. आज या वीर जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
यशचे वडील दिगंबर देशमुख यांनी सांगितलं की, यश सप्टेंबर महिन्यात घरी आला होता. 2 ऑक्टोबरला परत गेला. 4 दिवसांपूर्वी फोनवर बोलणं झालं होतं, कसे आहात विचारलं होतं. गुरुवारी दुपारी मला लष्करी अधिकाऱ्यांचा फोन आला. तो खूप जिद्दी होता, परिस्थितीची त्याला जाणीव होती, असं त्यांनी सांगितलं.