उत्तर सोलापूर : – सव्वाआठशे असलेल्या वर्षांची परंपरा उत्तर सोलापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्डी येथील श्री यमाई देवीच्या नवरात्रोत्सवास उद्या (रविवार) पासून सुरुवात होत आहे सकाळी नऊ वाजता देवीची पूजा होईल. त्यानंतर घटस्थापना होणार आहे. नवरात्र उत्सव काळात दररोज पहाटे चार वाजता महापूजा, सकाळी नऊ वाजता नित्यपूजा, रात्री आठ वाजता शेजारती असे नित्य उपचार होतात.
यंदा नऊ माळा आल्या असून गुरुवारी ललिता पंचमी आहे. या दिवशी देवीची विशेष पूजा केली जाते. ललिता पंचमीपासून घट उठेपर्यंत गावातील भाविक श्री यमाई देवीच्या मंदिरात वास्तव्यास जातात व त्याठिकाणी देवीची आराधना करतात. रविवार, २२ दुपारी आद्य देवीभक्त श्री रंगनाथ स्वामी मोकाशी यांनी स्थापन केलेल्या श्री रेणुकादेवी मंदिरात नवचंडी होम होतो, तर रविवारी रात्री अकरा वाजता श्री यमाई देवीच्या मंदिरातील नवचंडी होमाला सुरुवात होते.
सोमवार, २३ रोजी खंडेनवमी असून रविवारी उत्तर रात्री म्हणजे उजाडता सोमवारी यमाईदेवीच्या मंदिरातील नवरात्रौत्थापन होईल. नवरात्र उत्सव काळात भाविकांची देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते. २४ रोजी विजयादशमी असून सायंकाळी सात वाजता श्री यमाईदेवीच्या उत्सव मूर्तीची व पादुकांची पालखी मिरवणूक निघते.