पुणे : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे वाहनचालक त्रस्त आहेत. तर, सरकारकडूनही पेट्रोल-डिझेलला पर्याय शोधण्यात येत असून सध्या सीएनजी वाहनांना मोठी मागणी असून चारचाकी सीएनजी वाहनांची बाजारात चलती असल्याचं पाहायला मिळते. त्यातच, आता बजाजकडून जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच करण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते आज पिंपरी चिंचवडमध्ये या बाईकचा लाँचिंग सोहळा पार पडला. यावेली, ही सीएनजी बाईक जगातील पहिली सीएनजी दुचाकी असल्याचा दावा बजाजकडून करण्यात आला आहे.
पेट्रोलच्या वाढत्या दराने त्रस्त झालेल्या दुचाकीस्वारांची आता लवरकरच मुक्तता होणार आहे. कारण, बजाजने वाढत्या पेट्रोलच्या दराला पर्याय म्हणून सीएनजी बाईकची निर्मिती केली. ज्या बाईकचं अनावरण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते झालं. जगातील ही पहिली सीएनजी बाईक असल्याचा दावा बजाज कंपनीने केला आहे. या बाईकमुळं दुचाकीस्वारांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ऑटोमोबाईल क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. सीएनजी बाईक ही “बजाजची गॅरंटी” आहे, असं आम्ही म्हणू शकतो. आता तुम्हीही तुमच्या भाषणात ‘नितीन गडकरींची गॅरंटी’ असा उल्लेख कराल, अशी अपेक्षा आहे, असे म्हणत राजीव बजाज यांनी केंद्रीयमंत्र्यांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. सीएनजी पंपची देशभरात कमतरता आहे, या सीएनजी पपंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवावी. या अनुषंगाने राजीव बजाज यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. तर, नितीन गडकरी यांनीही आपल्या भाषणात बोलताना बाईकच्या किंमतीबाबत अपेक्षा व्यक्त केली.