सोलापूर – जागतिक अंडी दिनानिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या सघन कुक्कुट विकास गटाच्या वतीने विविध शाळा व अंगणवाड्यांमध्ये अंड्याचे पोषणमूल्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. नेहरू नगर, लष्कर व राज्य राखीव पोलीस दल गट क्र. १० येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाड्यांमध्ये प्रशिक्षणार्थी व विद्यार्थ्यांना सुमारे १ हजार उकडलेली अंडी वाटप करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय (प्रभारी) डॉ. व्हि. डी. येवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. स्नेहंका बोधनकर, पशुधन विकास अधिकारी गट-अ यांनी अंड्याच्या पोषणतत्वांबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांनी व नागरीकांनी दैनंदिन आहारात अंड्याचा समावेश करून आरोग्यरक्षण करावे, असे आवाहन केले.
प्रमुख पाहुणे डॉ. भोसले शिवाजी (खाजगी पोल्ट्री सल्लागार, सोलापूर) यांनी अंडी हे भेसळमुक्त व शाकाहारी असून, नियमित सेवनामुळे कर्करोगासारख्या आजारांवर मात करता येते, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमासाठी अंड्यांचे प्रयोजन श्री. प्रसाद कृष्णाजी भगत (भैरवनाथ हायटेक अग्रो प्रा. लि., मुस्ती) व श्री. वेकंटराव (बालाजी पोल्ट्री फार्म, बाणेगाव) यांनी केले. शाळांचे मुख्याध्यापक श्री. थोरबोले, श्रीमती ज्ञानेश्वरी संगीतकर व श्री. पुंडलिक कलखांवकर यांच्यासह शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
हा उपक्रम अंड्याच्या पोषणमूल्याविषयी जनजागृती करताना कुक्कुटपालन व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष कृतीचा अनुभव देणारा ठरला.