सोलापूर :- गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतील कामे पावसाळा चालू होण्याच्या आत गती देवून वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हास्तरीय आढावा बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, उपविभागीय जलसंधारण अधिकारी आर. डी. क्षीरसागर, कृषी उपसंचालक ए. सी. धेडे, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी एस. एस. पारसे,उपविभागीय जलसंधारण अधिकारी सी. एस. सोनवणे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी योजनेची जिल्ह्यातील सद्स्थितीची संबंधित यंत्रणांकडून माहिती घेऊन कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या. संबंधित यंत्रणेकडून रद्द कामांबाबत माहिती घेऊन कारणे जाणून घेतली. तसेच जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचे सुरू असलेली कामे अत्यंत काटेकोरपणे करून घ्यावीत धरणातील जास्तीत जास्त गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर जाऊन त्याची सुपीकता वाढेल या दृष्टीने प्रयत्न करावेत व गाळ काढल्याने पाणी साठवून क्षमता वाढेल त्यामुळे त्याचा सिंचनाला लाभ होईल या दृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजनबद्ध रीतीने कामे पूर्ण करून घेतली पाहिजेत असेही त्यांनी निर्देशित केले.
जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण 209 कामापैकी 125 कामे पूर्ण झालेली आहेत. सेल्फवर असलेल्या 84 कामांपैकी 14 कामे पूर्ण करण्यात आलेली असून यामधून 6.19 लक्ष घ. मी. इतका गाळ काढण्यात आलेला आहे. उर्वरीत 70 कामांपैकी 2 कामे सुरू करण्यात आलेली आहेत. या दोन कामांमधून 38 हजार 445 घ.मी. इतका गाळ काढण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी दामा यांनी दिली.



