महिला सक्षमीकरण व प्रशासकीय सुधारणा कार्यशाळा उत्साहात संपन्न.
जिल्हा परिषद ग्रामपंचायत व महिला बाल कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने महिला ग्रामसेवकांसाठी महिला सक्षमीकरण व प्रशासकीय सुधारणा कार्यशाळा केगाव येथील सिंहगड महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी शहा बोलत होत्या. पुढे बोलताना शहा म्हणाल्या की महिला या कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत अधिक सक्षम आहेत. परंतु समाजव्यवस्थेने त्यांना दुय्यम स्थान दिले आहे. फक्त ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागात सुद्धा महिलांना आजही दुय्यम स्थान दिले जाते. महिलांनी स्वतः मध्ये आत्मविश्वास वाढवावा. स्वतःला कधीही दुय्यम समजू नका. महिलांमध्ये धैर्याची कमी नाही. त्या कोणत्याही परिस्थितीस पुरुषांच्या तुलनेत धैर्याने तोंड देतात. ग्रामसेविकांना ग्रामीण भागात काम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. प्रशासकीय सुधारणांबरोबरच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत यावेळी शहा यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, महिला व बाल कल्याण विभागाचे मोहीम अधिकारी जावेद शेख, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभा साखरे, डॉ. शुभांगी तनपुरे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सीईओ स्वामी म्हणाले की महिला या साक्षात शक्ती स्वरूपा आहेत. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती या प्रमुख देवता या महिलाच आहेत. महिलांनी स्वतःमधील शक्ती ओळखणे आवश्यक आहे. मुला मुली मध्ये आई म्हणून आपणच भेदभाव करतो तो थांबणं गरजेचे आहे. महिलांमधील शक्तीची ओळख करून देण्यासाठीच आजच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यामागील उद्देश आहे. आमच्या महिला ग्रामसेविका या ग्रामीण भागात काम करताना त्या आत्मविश्वासाने येणाऱ्या प्रत्येक अडचणींना सामोरे जाव्यात. त्यांच्या प्रशासकीय कामकाजांच्या सुधारणे बरोबरच आरोग्याच्या समस्या जाणून घेवून त्याबाबत त्यांच्यात जागृती निर्माण करणे हाही उद्देश या कार्यशाळेचे आयोजन करण्यामागे आहे. यासाठीच आज डॉ. साखरे व डॉ. तनपुरे यांना महिला ग्रामसेविकांशी मनमोकळा संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले आहे.
यावेळी बोलताना इशाधीन शेळकंदे म्हणाले की महिला ग्रामसेविकांनी आपले कामकाज करताना महिला सरपंच व सदस्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव व ग्रामपंचायत कामकाजाविषयी महिती देण्याचे काम प्राधान्याने करणे गरजेचे आहे. आपल्या अधिकाराची जाणीव झाल्याशिवाय महिला खऱ्याअर्थाने सक्षम होणार नाहीत.
महिलांच्या आरोग्याविषयी चर्चासत्रावेळी सभागृहात उपस्थित सर्व पुरुष अधिकारी व कर्मचारी हे सभागृहातून बाहेर पडले. यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. साखरे व डॉ. तनपुरे यांनी महिला ग्रामसेविकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.
सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
प्रास्ताविक जिल्हा मोहीम अधिकारी जावेद शेख यांनी केले. सुत्रसंचलन अंगणवाडी पर्यवेक्षिका माधवी शिंदे यांनी केले. कार्यशाळेच्या नियोजनासाठी गोपाळपूरच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका ज्योती पाटील यांनी परिश्रम घेतले.